Religious Harmony FoundationTM

Religions Of The World

“जय महाराष्ट्र! प्रिय मित्रमंडळी,बंधू आणि भगिनींनो! तुम्हा सर्वांना निशिगंधा वाडचा नमस्कार! आजपर्यंत अनेक गाजलेल्या नाटक-सिनेमांतून आणि निरनिराळ्या मालिकांतून मी आपल्यासमोर आले आहे. परंतु आज मी तुमच्या समोर केवळ एक अभिनेत्री म्हणून नव्हे तर एक सुज्ञ नागरिक आणि तुमची हितचिंतक म्हणून येते आहे. धार्मिक एकात्मतेमधून संपूर्ण विश्वांत शांती प्रस्थापित करण्याचा एक प्रस्ताव मांडते आहे,ज्यामुळे केवळ तुम्ही आम्हीच नाही तर सारा देशच प्रगतिपथावर जाईल.

मंडळी, सर्वप्रथम आपण धर्म म्हणजे काय ते जाणून घेऊ या. ऑक्सफर्ड डिक्शनरी सांगते की “मानवजातीवर नियंत्रण ठेवणाऱ्या देव नावाच्या एका अद्‍भूत शक्तीवर विश्वास दाखवून तिची केलेली पूजा म्हणजेच धर्म”.

वेबस्टरच्या म्हणण्यानुसार “धर्म म्हणजे धार्मिक विश्वास, श्रध्दा, रूढी व वृत्तींचा एकत्र मिलाफ”! विकीपिडिया मधल्या सर्वात अलिकडच्या व्याख्येनुसार धर्म म्हणजे “मानवता, अध्यात्म आणि नीतिमत्तेबरोबर जगातील सांस्कृतिक पध्दती, लोकांचा विश्वास आणि त्यांचे धार्मिक दृष्टीकोन यांची सांगड घालणे”!

अर्थात धर्माची व्याख्या काहीही असो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनांत धर्म अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. धर्म आपल्याला प्रामाणिकपणाने जगण्याची ,सत्याच्या मार्गाने चालण्याची आणि चांगले आचारविचार बाळगण्याची शिकवण देतो ज्यायोगे आपल्या रोजच्या जीवनाला योग्य वळण लागते. जगातील कित्येक लोक आपापल्या धर्मातील नीतीनियमांनुसार आचरण करतात व स्वत:ला वाईट कर्मांपासून दूर ठेऊन चांगले कार्य करायचा प्रयत्न करतात. धर्म म्हणजे जणू प्रकाशाचा तेजस्वी किरण जो लोकांच्या मनांतला व आयुष्यातला वाईट विचारांचा अंधार दूर करून हे जग अधिक चांगले व्हावे यासाठी लोकांमध्ये सुधारणा घडवून आणतो.

लोकहो, धर्म म्हणजे जणू एखादा दीपस्तंभच ! जो आपल्या जीवनरूपी नौकेला योग्य दिशा दाखवतो आणि जीवनाच्या वाटचालीत सन्मार्गाने पुढे नेतो. आता आपण विश्वशांतीची इच्छा बाळगणाऱ्या आणि तशीच शिकवण देणाऱ्या काही महत्वाच्या धर्मांबाबत अल्फाबेटिकल क्रमानुसार जाणून घेऊया.

बौद्ध धर्म: हा धर्म गौतम बुध्दाच्या जीवनावर व शिकवणीवर आधारित आहे. गौतम बुद्धाने त्याच्या अनुयायांना आयुष्यातली दु:खांबाबतची चार महत्वाची सत्य सांगणारा एक सर्वोत्तम मध्यम मार्ग अनुसरायला सांगितला. बुद्धाने आपल्या पाठीमागे लागणाऱ्या दु:खांची व वेदनांची रहस्ये उलगडली, प्रत्येक त्रासामागचे कारण शोधून काढले व ही दु:खे व त्रास नाहीसा करणारा मार्ग शोधून काढला. बुध्द धर्मांत संसार, कर्म व पुनर्जन्म या संकल्पनांना अतिशय महत्व आहे. बुद्ध योगी आठ सन्मार्गांचा अवलंब करून त्या आठ मार्गांची शिकवण देतात. हिरक सूत्र व त्रिपिटिका हे बौद्ध धर्मातले पवित्र ग्रंथ आहेत. लुंबिनी, बौद्धगया, सारनाथ इ. बुद्ध धर्माची तीर्थक्षेत्रे आहेत. आज जगांत अंदाजे ८० कोटी लोक या धर्माचे अनुयायी आहेत. या महान धर्माचा उगम नेपाळ व भारत देशांत झाला आणि कालांतराने तो चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम, कंबोडिया, तैवान, थायलंड, म्यानमार, भूतान आणि श्रीलंका इत्यादि देशांमध्ये पसरला.

ख्रिश्चन धर्म: हा धर्मही ईश्वर एकच आहे या कल्पनेवर आधारित असून तो येशू ख्रिस्ताने जीवनाबाबत दिलेल्या शिकवणीवर आधारित आहे. ख्रिश्चन धर्मीय देवाकडे आपल्या पित्याच्या नजरेने पहातात व येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र व “एक पवित्र आत्मा” असे मानतात. बायबल हा ख्रिश्चन लोकांचा पवित्र धर्मग्रंथ आहे.जेरूसलेम, बेथलेम, नाझरेथ इ. ख्रिश्चनांची पवित्र क्षेत्रे आहेत. आज जगांत अंदाजे २ अब्ज लोक ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, लॅटिन अमेरिका, युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, कोंगो, इथियोपिया, नायजेरिया व फिलिपाईन्स इ. देशांमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झालेला आहे.

हिंदू धर्म: हा जगांतील एक प्राचीन धर्म असून ही एक “जीवनशैलीच” आहे. हा धर्म बुध्दी व तत्वज्ञानांवर आधारित असलेल्या काही समजुती यांच्या मिलाफाने बनलेला आहे. हा एक शाश्वत धर्म आहे. ईश्वरी अवतार, ईश्वर एक आहे, आत्मा, कर्म, अहिंसा, मूर्तिपूजा, पुनर्जन्म, आणि चार पुरुषार्थ इ. संकल्पनांवर आधारित आहे. हिंदु धर्मीय लोक भगवद्‍गीता, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद व यजुर्वेद या चार वेदांना तसेच १८ पुराणे व उपनिषदांना सर्वात पवित्र धर्मग्रंथ मानतात. चारधाम, काशी, प्रयाग, नाशिक उज्जैन, मथुरा, वृंदावन व अयोध्या इत्यादि हिंदूची पवित्र तीर्थ क्षेत्रे आहेत. भारत आणि इतर सर्व देशांत मिळून या धर्माचे अंदाजे १०० कोटी अनुयायी आहेत. भारताबरोबरच नेपाळ, भूतान, श्री लंका, बांगला देश, फिजी, त्रिनिदाद, गयाना, मॉरिशस व सुरिनाम इ. देशांतही या धर्माचे पालन केले जाते.

इस्लाम धर्म: या धर्मानुसार ईश्वराला अल्ला मानले जाते व अल्ला सर्वत्र एकच आहे अशी या धर्माची संकल्पना आहे. इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार हजरत महंमद हा अल्लाचा शेवटचा पैगंबर मानला जातो. इस्लाम धर्म असे मानतो की सर्व मुसलमान अल्लाची प्रार्थना करण्यासाठीच या जगांत जन्मले आहेत. इस्लाम धर्माचे पाच स्तंभ आहेत ज्यांचे पालन करणे हे प्रत्येक मुसलमान व्यक्तीचे कर्तव्य आहे. कुराण हा या धर्माचा धर्मग्रंथ असून सौदी अरेबियातील मक्का व मदिना ही या धर्माची पवित्र स्थाने आहेत. जगांत या धर्माचे दीड(१.५) अब्ज अनुयायी आहेत.या धर्माचा उगम अरेबियामध्ये झाला व त्यानंतर, इंडोनेशिया, पाकिस्तान, भारत बांगला देश,इजिप्त, इ.देशांमध्ये त्याचा प्रसार झाला.

जैन धर्म: प्राचीन धर्मांपैकी अहिंसेला सर्वात जास्त महत्व देणारा धर्म म्हणजे जैन धर्म! जैन लोक २४ तीर्थंकरांवर श्रध्दा ठेवतात व अरिहंत भगवान यांची पूजा करतात. या धर्माचे प्रथम तीर्थंकर रिषभदेव होते व अंतिम तीर्थंकर श्री महावीर स्वामी आहेत. जैन धर्मात सम्यक दर्शन, ज्ञान व चरित्राद्वारे अध्यात्मिक उन्नती व मोक्ष प्राप्त करणे या सिध्दांतांना महत्व दिले जाते. जैन धर्माची महत्वाची तत्वे म्हणजे पूर्ण अहिंसा, जीवदया, शाकाहार, चोरी न करणे, आत्मसंयम, निग्रह, ब्रम्हचर्य, खरे बोलणे व अपरिग्रह ही आहेत. जैन धर्मानुसार प्रत्येक आत्म्याचे अंतिम ध्येय हे जन्म व मृत्यूच्या फेऱ्यापासून मोक्ष मिळवणे हे असते. आगम व कल्पसूत्र हे जैन धर्माचे पवित्र धर्मग्रंथ आहेत. पालिताणा, पावापुरी व सम्मेत शिखर ही जैनांची पवित्र तीर्थस्थाने आहेत. जगांत या धर्माचे अंदाजे २ कोटी अनुयायी आहेत. भारत, केनिया, नेपाळ, फिजी, बेल्जिअम, अमेरिका, कॅनडा व मलेशिया इ. देशांत या धर्माचे अनुयायी आहेत.

ज्यू धर्म: या धर्माचा उगम हिब्रू बायबलमध्ये झाला ज्यांत ईश्वराने इस्त्रायलमधील जनतेशी नाते जोडण्यासाठी या धर्माची स्थापना केल्याचे मानले जाते. या धर्माचे दहा आदेश व नियम, सिनई पर्वतावर, मोझेसना दाखवण्यात आले व त्यांनी “टोराह” म्हणजे श्लोकांच्या स्वरूपांत त्यांची रचना केली. ज्यू धर्म हा ईश्वर एकच आहे असे मानणारा जगातला प्राचीन धर्म आहे. जेरूसलेम, हिब्रॉन, वेस्टर्न वॉल, सफेद इ.ज्यू धर्माची धार्मिक स्थळे आहेत. आज जगांत ज्यू धर्माचे सुमारे दीड कोटी (१.५) अनुयायी आहेत. इस्त्रायल,उ. अमेरिका, फ्रान्स,कॅनडा,इंग्लड, इ. देशांत या धर्माचे अनुयायी आढळतात.

शीख धर्म: “वाहे गुरू”वर श्रध्दा असलेल्या शीख धर्माचे, गुरू नानकदेव हे पहिले धर्म गुरू ! त्यांनीच शीख धर्माची स्थापना केली. या धर्मांत १० गुरू होऊन गेले. वाहे गुरू, काळाच्या पलिकडे असलेला (अकाल), आकार नसलेला (निरकांर) , समदृष्टी बाळगणारा “अल्लख” व भेदभाव न ठेवणारा म्हणजे असा आहे. समानता, खरेपणा, एकनिष्ठता, संयम व पावित्र्य ही या धर्माची मुख्य तत्वे आहेत. गुरू ग्रंथ साहेब हा या धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. अमृतसर येथील सुवर्णमंदिर, नांदेड व नानकाना साहिब ही शिखांची प्रमुख प्रार्थना स्थळे आहेत. जगभरात शीख धर्मीयांची संख्या अंदाजे ३ कोटी असून हे लोक प्रामुख्याने भारत,अमेरिका,कॅनडा, इंग्लंड,मलेशिया,इ. देशांमध्ये आढळतात.

झोरास्ट्रिअन धर्म: या धर्माचा उगम प्राचीन इराणमध्ये झाला. पैगंबर झोरास्टर हे या धर्माचे जनक होत. पारसी व इराणी लोक या धर्माचे अनुयायी आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की त्यांचा देव – अहुरा माझदा हा पूर्णतः शुद्ध व पवित्र आहे आणि तो सगळ्या चांगल्या गोष्टींचा निर्माता आहे. या धर्माचा असा विश्वास आहे की चांगले कर्म, चांगले बोलणे व चांगल्या कामांद्वारे आपण अहुरा माझदा या सर्वोच्च शक्तीला प्रसन्न करून घेऊ शकतो. या धर्मानुसार अग्नि व जल हे धार्मिक विधींच्या शुध्दीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. पारसी व इराणी लोक अग्यारीमध्ये अग्निची पूजा करतात. इराणमधील याझ हे त्यांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे व अवेस्ता हा त्यांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. सुमारे २५ लाख लोक या धर्माचे अनुयायी आहेत व ते भारत, इराण, अमेरिका अफगाणिस्तान व पाकिस्तान, इ. देशांत प्रामुख्याने आढळतात.

बंधूभगिनींनो, या धर्मांबरोबरच शिंटो, टाओ, कनफ्युशिअस, बहाई, सायंटोलॉजी यांसारखे असंख्य धर्म या पृथ्वीतलावर गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

आपण सर्वांनी हे लक्षांत घेतले पाहिजे की सर्व धर्मांची शिकवण चांगलीच आहे व त्यानुसार ईश्वर ही एक सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. ही शक्ती या विश्वाची निर्मिती आहे आणि आपण सर्वही या शक्तीपासूनच निर्माण झालो आहोत. वेगवेगळ्या धर्मातले लोक या शक्तीला वेगवेगळे नाव देतात व वेगवेगळ्या प्रकारे तिचे पूजन करतात. पण सत्य हेच आहे की परमेश्वर एकच आहे आणि तो सर्वत्र सारखाच भरून राहिला आहे. म्हणूनच सर्व धर्मातील लोकांनी एकत्र येऊन एकात्मतेची भावना जोपासली पाहिजे. प्रत्येकानेच आपल्या धर्माबरोबरच दुसऱ्या धर्माचाही तितकाच आदर बाळगला तर या विश्वात शांती निर्माण होईल. आपल्या धर्माबरोबरच इतर धर्माला आपण महत्व दयायला शिकलो तर आपोआप माणसांमाणसांमध्ये प्रेम व बंधुभाव निर्माण होईल व या जगात शांतीच वातावरण पसरेल. देव आपल्याला हेच सांगतो ना? परमेश्वराची भक्ती करण्याचा हाच मार्ग आहे हे सर्वांनी ओळखले पाहिजे.

वेगवेगळ्या धर्मांच्या सर्व धर्मग्रंथातले ज्ञान म्हणजे अमृतकणच जणू! आपण विविध धर्मांचे ग्रंथ वाचल्यास त्या त्या धर्माविषयीच्या आपल्या ज्ञानांत भर पडते व आपला त्या धर्माबाबतचा दृष्टीकोन बदलतो व दुसऱ्या धर्माबाबत आपल्या मनांत सहनशीलता व सहिष्णूतेची भावना निर्माण होते. सर्व धर्मग्रंथ जरी निरनिराळे मार्ग दाखवत असले तरी सर्वांचे अंतिम उद्दिष्ट एकच असते ते म्हणजे परमेश्वराचा कृपाप्रसाद प्राप्त करणे.

कुठल्याही देशाच्या भरभराटीसाठी त्या देशांत शांतीचे वातावरण असणे अत्यंत जरूरी आहे. ज्या देशांत वारंवार मोठया प्रमाणावर हिंसाचार व अशांतीच्या घटना घडत असतात तो देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी गुंतवणूकदार येत नाहीत, व्यवसाय वाढत नाही, रोजगारांच्या संधी निर्माण होत नाहीत. कुठल्याही ठिकाणाच्या, कुठल्याही प्रकारच्या अशांतीचा परिणाम आपल्या जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे होत असतो. कारण व्यापार, उद्योग, अर्थव्यवस्था या सर्व गोष्टी परस्परांवर अवलंबून असतात. याकरताच परस्पर धर्मांबाबत आदर बाळगून शांतीचे वातावरण राखणे हे आपल्या सर्वांच्याच हिताचे आहे.

कुठलाही देश एकटेपणाने व स्वतंत्रपणे सर्व कामगिरींमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. प्रत्येक देशांत विविध संस्कृतीचे लोक रहातात पण सर्वांचे ध्येय सारखेच असते ते म्हणजे आपल्या देशाची प्रगती व्हावी आणि आपल्या देशांत आनंदाने व शांतीने रहाता यावे. एखाद्या देशांत एखादा धर्म मोठया प्रमाणावर आढळतो तर तोच धर्म दुसऱ्या एखाद्या देशांत कमी प्रमाणांत असलेला दिसतो. असे असताना त्या अल्पसंख्याक धर्माला कमी लेखणे म्हणजे स्वत:च्या धर्माचाच अनादर करून घेण्यासारखे आहे. जसे जंगलात पेटलेल्या वणव्याची आग पसरत गेली तर पूर्ण जंगल आगीत भस्मसात होते, त्याचप्रमाणे धर्मद्वेषामुळे माणुसकीला काळीमा लागतो व इतकेच नव्हे तर मानवतेची संकल्पनाही नष्ट होते. आपल्या धर्माबरोबरच इतर धर्मांचा आदर केल्यास विविधतेमधील एकतेद्वारा आपल्या देशाचे कल्याण होईल. आपल्या सर्वांना आपले जीवन शांतीपूर्ण व्हावेसे वाटते पण ते तसे तेव्हाच होईल जेव्हा धर्म, जात, पंथ, राष्ट्रीय़त्व, वर्णभेद यांची बंधने झुगारली जातील व संपूर्ण मानवजातीमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होईल.

मंडळी,आता खरोखरच आपल्या भूतकाळांतील चुकांपासून धडा घेऊन योग्य ती पावले उचलायची वेळ आली आहे. धर्माच्या नावाने जातीजमातींमध्ये हिंसा घडून येण्याच्या कितीतरी घटनांना इतिहास साक्षी आहे. समाजातील विविध जातीजमातींमध्ये झालेल्या भांडणांमुळे देशांतर्गत फाळण्या होऊन कुटुंबच्या कुटुंबे उध्वस्त झाल्याच्या घटनाही पहायला मिळतात. शांतीपूर्ण जीवन जगता येणे हा घटनेनेच प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे. पण या कायदेशीर हक्कांचे उल्लंघन होताना दिसते आहे. मानव हीच जात व माणूसकी हाच धर्म हेच सत्य प्रत्येकाने आपल्या हृदयावर कोरले पाहिजे तरच या जगांत होणारा मोठा अनर्थ टळेल. देशांचे विभाजन,दहशतवादी कृत्ये, वंशभेद व वर्णभेदावरून होणाऱ्या असंख्य मारामाऱ्या या सर्वांमुळे लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत,

राष्ट्रे उध्वस्त झाली आहेत व कायमची शांती भंग पावली आहे. युध्दांमध्ये गिळंकृत केल्या गेलेल्या राष्ट्राला अपमान, सहन करावा तर लागतोच शिवाय अशा राष्ट्रातील लोकांच्या उदरनिर्वाहाची साधने हिरावून नेली जातात व ती दुखावली जातात. परस्परांबद्दलचा द्वेष, असहिष्णूता व क्षोभ इ. भावना वणव्याच्या आगीप्रमाणे पसरत जातात. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसते. शिवाय जगामध्ये त्या राष्ट्राच्या नावाला कलंक लागतो तो वेगळाच! या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे त्या देशाची आर्थिक हानी, सामाजिक अप्रतिष्ठा, आर्थिक बाजारांत पीछेहाट, व्यापार व व्यवसायांना उतरती कळा लागणे अशा प्रकारे झालेला दिसतो व तो देश पुन्हा अधोगतीला लागतो. तात्पर्य हे की “धार्मिक असहिष्णूतेमुळे” देशाचे आर्थिक, सामाजिक व नैतिक नुकसान तर होतेच आणि एकंदरीतच देशामध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरते.

बंधू भगिनींनो,आता आपल्या पुढे मोठा प्रश्न आहे तो या जगांत शांतीचे वातावरण निर्माण कसे करायचे?

यासाठी सर्वप्रथम प्रत्येकाने आपापल्या धर्माचे अनुसरण केले पाहिजे, त्या त्या धर्मातल्या तत्वांचे पालन केले पाहिजे. जेव्हा तुम्ही आपापल्या धर्माच्या तत्वांचे पालन कराल तेव्हा आपोआपच तुमच्या हृदयात संपूर्ण मानवजातीबद्दल प्रेम व आदर निर्माण होईल कारण तुमच्या धर्माची शाश्वत तत्वे तीच शिकवण देतात जी इतर धर्मांच्या तत्वांमध्ये दिली जाते. आपण आपल्या धर्माला पूर्णपणे जाणून घेतले नाही तर आपल्याला इतर धर्मवासियांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार राहत नाही हे प्रत्येकाने लक्षांत घेतले पाहिजे.

आपल्या धर्माबद्दल पूर्णपणे जाणून घेणे व धर्मातल्या तत्वांचे पालन करणे तसेच दुसऱ्या धर्मांमधे ढवळाढवळ न करणे ही विश्वात शांती निर्माण करण्यासाठीची गुरूकिल्ली आहे. दुसऱ्या धर्मांबाबतच्या गैरसमजूती, किंवा मनांतील शंकाकुशंका दूर करण्यासाठी त्या त्या धर्माची ओळख करून घेणेही अत्यावश्यक आहे. असे केल्यास आपण खऱ्या अर्थाने आपल्या धर्माचे अनुयायी होऊ आणि एक चांगली व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ.

आज जग जवळ आले आहे. त्यामुळे एका देशातली दु:खे, संकटे, दुर्घटना इ.चे पडसाद सर्वत्र उमटतात. देश किंवा धर्म कोणताही असो, प्रत्येकाला होणाऱ्या वेदना सारख्याच असतात. म्हणूनच आपण कुठल्याही धर्म, देश किंवा जातीच्या लोकांबरोबर भेदभाव करणे अयोग्य आहे. उलट सर्वांशी मिळून मिसळून राहिले पाहिजे, विविध धर्म, वंश किंवा पंथांशी संवाद साधला पाहिजे व एकतेची भावना जोपासली पाहिजे. विविध धर्माच्या, प्रांताच्या किंवा जातीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले पाहिजे. आपल्या सहवासांत येणारी व्यक्ती कोणत्याही धर्मातली, वंशातली किंवा देशातली असो, आपण तिला मदत केली पाहिजे व विविध धर्मांतल्या लोकांबाबत सहिष्णुता दाखवली पाहिजे.

कुठल्याही कुटुंबातल्या दोन व्यक्तींच्या आवडीनिवडी सारख्या नसतात तसेच एखाद्या गोष्टीबाबत जगातील कुठल्याही दोन व्यक्तींच्या श्रध्दा व विश्वासही सारखे नसतात. असे असताना आपण आपली मते किंवा आपला धर्म इतरांवर कसे लादू शकतो? आपला स्वार्थ साधण्यासाठी आपण धर्माच्या नावाने कुणाच्याही भावना भडकवू नयेत व द्वेषभावनेला खतपाणी घालू नये. अशा वाईट विचारांची ठिणगी ताबडतोब विझवली पाहिजे नाहीतर तिचे रूपांतर मोठया आगीत होऊन त्यामधे आपणच भस्मसात होऊन जाऊ.

कुठल्याही देशांतले धार्मिक ऐक्य वाढवण्यासाठी व ते टिकवून ठेवण्यासाठी त्या त्या देशाचे सरकार महत्वाची भूमिका बजावते. शासन व राजकीय नेत्यांना हे समजलेच पाहिजे की जागतिक शांतीसाठी धार्मिक एकात्मता हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. शासनाने नैतिक मूल्यांची जपणूक करून नि:पक्षपातीपणाने देशांतील सर्व नागरिकांसाठी समान संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत मग ते कोणत्याही धर्माचे, जातीचे, वंशाचे किंवा पंथाचे असोत. तरच ते शासन खऱ्या अर्थाने “सुराज्य” निर्माण करू शकेल. शासन व राजकीय नेतेमंडळींनी, धार्मिक एकात्मतेमधून विश्वशांतीकरता आजच्या युगातले शांततेचे दूत म्हणून कामगिरी केली पाहिजे.

राजकीय पाठिंब्याबरोबरच धार्मिक क्षेत्रांत काम करणाऱ्या नेतेमंडळींनाही आपल्या अनुयायांसाठी आदर्श निर्माण करता आला पाहिजे. आपापल्या धर्मातल्या खऱ्या चालीरिती पाळल्या पाहिजेत व धर्माची खरी शिकवण दिली पाहिजे. विविध धर्मातल्या नेतेमंडळींनी एकत्र आले पाहिजे एकजुटीनेपरस्पर धर्मीयांबाबत स्नेह, प्रेम व आदराच्या भावना जोपासण्याचे प्रयत्न केले पाहिजेत व त्याचबरोबर समाजासाठी उपयोगी प्रकल्प हाती घेतले पाहिजे. या मंडळीनी सक्रियपणे धार्मिक एकात्मतेच्या चळवळीत पुढाकार घेतला पाहिजे व विविध धर्मांच्या लोकांनी आपसात शांतीने रहाण्यासाठी आदर्शवत मार्गदर्शन केले पाहिजे.

बंधू भगिनींनो, धर्म या गंभीर विषयावरचे विचार व दॄष्टीकोन व्यक्त करून माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न केला आहे. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचे हृदय परिवर्तन होईल अशी मी आशा करते. असे जर झाले तर मी परमेश्वराचे ऋणी होईन कारण त्याच्याच कृपेने मी गोळा केलेल्या ज्ञानाची शिदोरी लोकांमध्ये वाटण्यासाठीचे व्यासपीठ मला मिळाले आहे.

या जगांत धार्मिक एकात्मतेचे बीज रूजवण्याची अत्यंत महत्वाची कामगिरी तुमच्यापैकी प्रत्येक जण करू शकतो.

धार्मिक एकात्मतेशिवाय या जगांत शांती नांदू शकत नाही हे तुम्हाला जाणवले पाहिजे. या जगामधली शांती उद्ध्वस्त करणाऱ्या वाईट शक्ती तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत व त्या शक्तींना तुम्ही नामोहरम केले पाहिजे.

धार्मिक एकात्मता वाढीला लागण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व उपक्रमांना व प्रयत्नांना तुम्ही पाठींबा दिला पाहिजे. कारण तुमच्या प्रयत्नांमुळेच या जगांत एक ना एक दिवस शांती नांदू शकेल.

धार्मिक एकात्मता म्हणजे तुमची स्वत:ची स्वप्ने पूर्ण होऊन तुम्ही जीवनांत यशस्वी होण्यासाठी व या देशाची भरभराट होऊन शांतीपूर्ण जीवन जगता येण्यासाठीचे साधन आहे याची जाणीव तुम्हाला झालीच पाहिजे.

विश्वशांती घडवून आणण्यासाठी धार्मिक एकात्मता हा एकमेव उपाय आहे कारण हे जग विविध धर्मातल्या, जातीजमातीतल्या आणि वंशाच्या व्यक्तींनी बनलेले आहे. विविध धर्मीय किंवा जातीजमातींच्या समुदायांमध्ये आपसात शांती असेल तर पर्यायाने पूर्ण समाजातच शांती नांदते व असा शांतीपूर्ण समाज त्या देशाचे चित्र पालटतो व त्याला प्रगतीपथावर नेऊन अधिक सामर्थ्यशाली बनवू शकतो. असा सामर्थ्यशाली देश या जगात शांती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो.

आपल्याला हवा असणारा बदल आपणच घडवून आणायचा आहे. यासाठी सर्वांनी एकजुटीने विश्वशांतीसाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी सर्वात आधी आपण आपल्या धर्माचेपालन करूया आणि मग धार्मिक एकात्मतेद्वारे आपले आयुष्य आनंदी करून जगण्याची मजा लुटूया.

मंडळी,उगवता सूर्य, ताज्या हवेची झुळूक, अथांग निळा समुद्र, पांढरे शुभ्र ढग! या साऱ्या गोष्टी मनाला किती उल्हसित करतात, आपल्या मनात एक नवीन चेतना भरतात, होय ना? …..विश्वशांतीमुळे मनुष्याला मिळणारे आयुष्यही अगदी तसेच असेल, जगायला उमेद देणारे अन्‍ एक नवीन चेतना जागवणारे …..अशा दुनियेत रहायला आपल्या प्रत्येकालाच आवडेल,खरंयं ना?

चला तर मग, आपण सर्वजण मिळून धार्मिक एकात्मतेची शपथ घेऊ या आणि एक शांतीमय विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करूया.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

……………………………………………………………………………………………………….

रिलिजिअस हार्मोनी फाऊंडेशन या संस्थेची उद्दिष्टे: रिलिजिअस हार्मोनी फाऊंडेशन ही संस्था, विविध धर्मांच्या, जातींच्या, पंथांच्या, वर्णांच्या, जमातींच्या, भाषांच्या, राष्ट्रीयत्वाच्या व वेगवेगळया संस्कृतीच्या लोकांमध्ये एकात्मता आणणे या उद्देशांसाठी स्थापन झाली आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विश्व शांतीसाठी धार्मिक एकात्मता निर्माण व्हावी म्हणून संस्था कार्यशाळा, व्याख्याने, खास कार्यक्रम इ.चे आयोजन करणे, शांती व एकात्मता वाढीस लागण्यासाठी आदर्श कामगिरी करणाऱ्या ख्यातनाम व्यक्तींना संस्थेतर्फे गौरवणे या सारखे उपक्रम संस्थेद्वारे हाताळले जातात. संस्थेच्या सल्लागारांमध्ये ख्यातनाम विद्वान मंडळी, संत व विविध धर्मातील व समुदायातील उच्च पदांवरील व्यक्तींचा समावेश होतो. अनेक गुणवंत व्यक्ती संस्थेच्या पदाधिकारी आहेत व त्यात श्री. मनिष त्रिपाठी संस्थेचे अध्यक्ष, श्री. ईश्वर हाप्पे, उपाध्यक्ष, श्री. अभिषेक दिनकर एकल, सचीव, सौ. स्मिता सुहास पाटील, खजीनदार व श्री. विजय शेळके, सहसचीव यांचा समावेश आहे.

या गुणवान व्यक्तींनी विश्वशांतीसाठी, धार्मिक एकात्मता वाढीस लागण्यासाठी स्वत:चे वेगळे मार्ग अवलंबून मोठा हातभार लावला आहे. त्यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे व पाठींब्यामुळे रिलिजिअस हार्मोनी फाऊंडेशनचे रोपटे जगांतल्या प्रत्येक देशांत रूजेल व पुढे जाऊन त्याचा एक मोठा आधारवृक्ष बनेल. आज रिलिजिअस हार्मोनी फाऊंडेशन जे कार्य करत आहे ते पाहून “इवलेसे रोपटे लावियले दारी…तयाचा वेलू गेला गगनापरि” ही उक्ति सार्थ होईल अशी खात्री आहे.

Leave a Reply

© Religious Harmony Foundation 2015